(मुंबई)
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी चिंतेची बाब समोर आली असून, अलिकडच्या अहवालांनुसार सुमारे 1.75 कोटी इंस्टाग्राम अकाउंट्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या डेटा लीकनंतर अनेक वापरकर्त्यांना अचानक पासवर्ड रीसेट करण्यास सांगणारे ईमेल आणि नोटिफिकेशन्स येत आहेत. असा कोणताही अनपेक्षित संदेश मिळाल्यास सावध राहण्याचे आवाहन सायबर सुरक्षा तज्ञांनी केले आहे.
सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते, हा प्रकार थेट अकाउंट हॅकिंगशी संबंधित आहे. यामध्ये वापरकर्त्यांची दिशाभूल करून त्यांच्या अकाउंटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष बाब म्हणजे, या फसवणुकीतील ईमेल हे अगदी खरे वाटावेत अशा पद्धतीने पाठवले जात असून, ते इंस्टाग्रामच्या अधिकृत ईमेल आयडीवरून आले असल्यासारखे दिसतात. त्यामुळे अनेक वापरकर्ते सहजपणे या सापळ्यात अडकत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लीक झालेला डेटा BreachForums नावाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर हॅकर्सनी Password Reset Attack नावाची नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. या पद्धतीत हॅकर्स थेट तुमचा पासवर्ड बदलत नाहीत, तर इंस्टाग्रामकडून पासवर्ड रिसेटची अधिकृत विनंती पाठवतात.
जेव्हा वापरकर्त्यांना असा ईमेल मिळतो, तेव्हा तो इंस्टाग्रामकडून आलेला खरा सुरक्षा इशारा समजून अनेक जण रिसेट लिंकवर क्लिक करतात. हीच चूक खात्यासाठी घातक ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये हॅकर्सना अकाउंटवर पूर्ण नियंत्रण मिळाल्याचेही समोर आले आहे. जर तुम्ही स्वतः पासवर्ड बदलण्याची विनंती केलेली नसेल, तर अशा ईमेलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेच सुरक्षित ठरेल.
अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?
तज्ञांच्या सल्ल्यानुसार, इंस्टाग्राम अकाउंट अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरण (2FA) सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 2FA सक्षम असल्यास, जरी हॅकरला तुमचा पासवर्ड मिळाला तरीही, खात्यात लॉग इन करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पडताळणी आवश्यक असते. यामुळे अकाउंट हॅक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी कोणतेही संशयास्पद ईमेल, लिंक किंवा संदेश मिळाल्यास सावध राहावे आणि थेट अॅपमधील सेटिंग्समधूनच पासवर्ड किंवा सुरक्षा बदल करावेत, असा सल्ला सायबर तज्ञांनी दिला आहे.

