(पुणे)
पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर कुटुंबियांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकरला अटक केली असून, गुन्हे शाखेने त्यांच्या कुटुंबावर व्यापक कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी आंदेकर कुटुंबाची सर्व बँक खाती व लॉकर सील केले आहेत. याचबरोबर नोंदणी महानिरीक्षकांकडून मालमत्तेची माहिती घेऊन फॉरेन्सिक ऑडिटरमार्फत तपास सुरू झाला आहे. मालमत्ता जप्तीची प्रक्रिया देखील हाती घेण्यात आली आहे. तसेच आंदेकर कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांच्या संचालकांची चौकशी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत छापेमारी करून कारवाई केली. गुन्हे शाखेने सोनाली आंदेकरसोबत कृष्णा आंदेकरच्या पत्नीला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण आंदेकर कुटुंब पोलिसांच्या चौकशीत आले आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी
गेल्या वर्षी कौटुंबिक वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गणेश कोमकरकडून हत्या करण्यात आली होती. याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने ५ सप्टेंबर रोजी गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली होती.
या प्रकरणानंतर पोलिसांनी मोठी मोहीम राबवून आतापर्यंत मुख्य आरोपी बंडूअण्णा राणोजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन युसूफ पठाण उर्फ खान, सुजल मेरगू, अमित पाटोळे, यश पाटील यांना अटक केली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला होता.

