( मुंबई )
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सोमवारी प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज चव्हाण यांचाच आल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली असून, या निवडीची औपचारिक घोषणा आज (मंगळवार) करण्यात येणार आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, अतुल सावे आदींच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा आज सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
सशक्त संघटनात्मक प्रवास
रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी म्हणून केली. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, चार वेळा आमदार, भाजप प्रदेश सरचिटणीस, तसेच राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. संघटनात्मक व प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर चव्हाण यांनी पक्षात स्वतःचे मजबूत स्थान निर्माण केले आहे.
कोकणात भाजपचा विस्तार
रवींद्र चव्हाण हे कोकणातील असून, त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजप कोकणात पक्षवाढीवर भर देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. “महायुतीमध्ये जागावाटपाच्या मर्यादा असल्या तरी भाजप कोकणात स्वतंत्रपणे पक्षविस्तार करणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.