( अहमदाबाद )
अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात आज सकाळी एक भीषण विमान अपघात झाला. एअर इंडियाचं लंडनकडे जाणारं AI-171 बोईंग 787-8 ड्रीमलायनर (सीरियल क्रमांक 36279) हे विमान टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत रहिवासी परिसरात कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी, दोन वैमानिक आणि १२ क्रू सदस्य होते.
सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सायंकाळी एक प्रवासी जिवंत आढळल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला. विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. सदर विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील प्रवास करत होते. दुर्दैवाने यात त्यांचा मृत्यू झाला आल्याचीही माहिती समोर येत आहे.
एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत एक प्रवासी जिवंत आढळला असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. विमानात 11A या सीटवर बसलेला प्रवासी जिवंत आढळला असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनेही दिलं आहे. ब्रिटिश नागरिक रमेश विश्वासकुमार हे काही दिवसांसाठी भारतात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आले होते. अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत ते वाचले असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. ( बातमी अपडेट होत आहे.)
अपघातस्थळी प्रचंड धुराचे लोट दिसून येत असून, जोरदार स्फोटानंतर विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर केवळ ७ किमी अंतरावर कोसळले. प्रारंभिक माहितीनुसार, विमानाचे पंख तुटलेले असून, अनेक भागांमध्ये पडझड झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. सात अग्निशमन गाड्या व बंब घटनास्थळी दाखल असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीन बचाव पथक, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) यांच्याद्वारे मदतकार्य वेगाने सुरू आहे.
एअर इंडियाने या अपघाताची अधिकृत पुष्टी केली असून, सध्या अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अहमदाबादचे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे.
या दुर्घटनेतील संभाव्य जीवितहानीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी, रहिवासी भागात विमान कोसळल्यामुळे मोठी हानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर एअर इंडियाने एक ट्वीट केले आहे. यात कंपनीने म्हटले की, “अहमदाबादवरुन लंडनलाा जाणाऱ्या AI171 या विमानाचा आज १२ जून २०२५ रोजी अपघात झाला आहे. सध्या आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू.