(लोणावळा)
लोणावळ्यावरून पुण्याकडे परतणाऱ्या कारचा भीषण अपघात होऊन दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुणे–मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील ईदगाह मैदानाजवळ घडला. मृत विद्यार्थ्यांची नावे सिद्धांत आनंद शेखर (२०, रा. झारखंड) आणि दिव्यराज सिंग राठोड (२०, रा. राजस्थान) अशी आहेत. तर हर्ष मिश्रा (२१) आणि निहार तांबोळी (२०) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी, सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सिम्बायोसिस कॉलेजचे चार विद्यार्थी संध्याकाळी लोणावळ्याला फिरायला गेले होते. परत येताना त्यांची स्विफ्ट कार देहूरोड बायपासवर असताना समोरील एका कंटेनरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. धडक एवढी जबरदस्त होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
अपघातात कारमध्ये सिद्धांत आनंद शेखर (वय २० वर्ष), दिव्यराजसिंग प्रेमसिंग राठोड (वय २० वर्ष) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय हर्ष मिश्रा (वय २१ वर्ष), निहार तांबोळी (२० वय वर्षे) हे किरकोळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटल वाकड येथे उपचार सुरू आहे. स्विफ्ट डिझायर कारमधील मुले सिम्बॉयसिस कॉलेजच्या BBA ला शिकत होते.
या घटनेतील आयशर कंटेनर चालक मनीष कुमार सुरज मणिपाल (39 वर्षे) वडाळा येथील राहणारा असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गाडीचा स्पीड जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. कार चालकाला डुलकी लागली की नेमकं काय झालं याबाबत तपास पोलीस करत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. .

