(लांजा)
मुंबई-गोवा महामार्गावर धनावडे शेती फार्मसमोर झालेल्या भीषण अपघातात मालवाहू ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेश रामजी मसालिया (वय ३२, रा. अंजार, जि. कच्छ, गुजरात) हा आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक (क्रमांक GJ १२ BZ २९१७) घेऊन मुंबईकडून गोव्याच्या दिशेने मुंबई-गोवा महामार्ग मार्गे जात होता. दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्म परिसरात सरळ आणि वळणाचा रस्ता असताना देखील वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रक भरधाव वेगात चालवित असताना तो रस्त्यालगतच्या सुरक्षा भिंतीवर आदळला आणि पुढे दिशादर्शक फलकाला धडकला. या भीषण धडकेत चालक जितेश मसालिया याला गंभीर दुखापत झाली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी रणजित विजय सार्दळ (रा. बसवेश्वर चौक, लांजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ३७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

