(मुंबई)
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त संस्थाने, विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग तसेच मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणीच्या अनुषंगाने राबवली जात आहे. विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर — https://mu.ac.in/admission — जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रवेशासाठी लागू असलेले अभ्यासक्रम:
पदवी अभ्यासक्रम
ही नोंदणी प्रक्रिया ३ वर्षांच्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांबरोबरच ४ वर्षांच्या ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी देखील बंधनकारक आहे. यामध्ये खालील अभ्यासक्रमांचा समावेश आहे:
-
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पारंपरिक अभ्यासक्रम — B.A., B.Sc., B.Com
-
विशेष अभ्यासक्रम — B.A.M.M.C., B.S.W., B.A. (Film, TV & New Media Production), B.A. (French/German Studies), Bachelor of Culinary Arts
-
इंटिग्रेटेड अभ्यासक्रम — B.A.-M.A. (German Studies/ Pali), B.M.S.-M.B.A.
-
B.Com विशेष शाखा — Financial Market, Accounting & Finance, Banking & Insurance, Investment Management, Transport & Management Studies
-
B.Sc विशेष अभ्यासक्रम — I.T., Computer Science, Hospitality, Microbiology, Biochemistry, Biotechnology, Maritime, Nautical Science, Forensic Science, Home Science, Aeronautics, Data Science, Aviation, Human Science
पदव्युत्तर अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठामार्फत संचालित १३३ विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीही ही ऑनलाईन नावनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती:
विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, १२ वीचा निकाल लागल्यानंतर विद्यापीठ स्वतंत्ररित्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतरच महाविद्यालये आणि विद्यापीठातील विभागांमार्फत प्रवेश सुरू होईल. या प्रक्रियेबाबत माहिती देताना परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले की, प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे.