(मालेगाव)
मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. “दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल,” असे स्पष्ट वक्तव्य उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी केल्याने मालेगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.
नवनिर्वाचित उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावले होते. यानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली. फोटो तात्काळ हटवण्यात यावा, अन्यथा आम्ही स्वतः मालेगावात येऊन तो काढू, असा इशाराही काही संघटनांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप करत उपमहापौरांच्या दालनातील छायाचित्र काढून टाकले होते.
हा वाद निवळतो न निवळतो तोच, किल्ला परिसरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी पुन्हा एकदा टिपू सुलतान यांची उघडपणे स्तुती केली. “इंग्रजांविरोधात लढलेल्या योद्ध्याचा फोटो लावण्यात गैर काय आहे?” असा सवाल उपस्थित करत, फोटो लावणे चुकीचे नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला. दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो फोटो लावला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केल्याने शहरात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्याच काळात उपमहापौरांच्या दालनातील छायाचित्र काढण्यात आले होते. मात्र, आता उपमहापौरांनी पुन्हा फोटो लावण्याचा निर्धार व्यक्त केल्याने मालेगाव शहरात राजकीय आणि सामाजिक पातळीवर नव्याने संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

