(दापोली / रत्नागिरी प्रतिनिधी)
मेहनतीची तयारी, धाडसाने उचललेले पाऊल आणि जिद्द साथ देत असेल तर अवघड असे काहीच नसते. हीच शिकवण दापोली तालुक्यातील तरुण शेतकरी भावेश कारेकर यांनी आपल्या कृतीतून साकारली आहे. आयटी क्षेत्रातील चमकदार करिअरला रामराम ठोकून त्यांनी दोन वर्षांपूर्वी गावाची वाट धरली आणि थेट बांबू शेतीच्या प्रयोगातून यशाचा नवा इतिहास रचला.
मांदिवली गावचा मुलगा असलेला भावेश पुण्यात आयटी क्षेत्रात स्थिरावला होता. मात्र, नोकरीत मन रमत नव्हते. गावाकडे परतल्यावर काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. त्याच काळात बांबू शेतीचा नवा मार्ग त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. सुरुवातीला दापोली व नंतर मंडणगड तालुक्यात प्रयोग सुरू झाले आणि आज तब्बल ५० एकरांवर बांबू शेती बहरली आहे. यामागे भोर (पुणे) येथील नर्सरी संचालक विनय कोलते यांचे मार्गदर्शन व मित्रांचे सहकार्य ठळकपणे लाभले.
भावेश कारेकर यांचे स्वप्न केवळ शेतीपर्यंत मर्यादित नाही. त्यांचा निर्धार आगामी काही वर्षांत हा प्रकल्प १,००० एकरांवर नेण्याचा आहे. बांबू शेती ही फक्त शेती नाही, तर एक सामाजिक चळवळ आहे, असे ते ठामपणे सांगतात. या उपक्रमातून युवकांना रोजगाराची दारे उघडतील, कोकणातील नैसर्गिक संपदा जपली जाईल आणि पर्यावरणपूरक औद्योगिक क्रांतीची नवी पहाट उगवेल, असा त्यांचा विश्वास आहे.
बांबू हा बहुगुणी व बहुउपयोगी वनस्पती प्रकार. फर्निचर, कागदउद्योग, बांधकाम साहित्य, हस्तकला, इंधन अशा असंख्य क्षेत्रांत त्याचा वापर होतो. त्यामुळे बांबूपासून उद्योगांची दारे उघडून हजारो हातांना काम मिळू शकते. कोकणात हरित औद्योगिक क्रांती घडवून हजारो युवकांना स्थिर रोजगार उपलब्ध करून देणे. हे कारेकर यांचे स्वप्न आहे.
जागतिक बांबू दिवस : हरित अर्थव्यवस्थेचा उत्सव
दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिवस साजरा केला जातो. २००९ मध्ये थायलंडमध्ये झालेल्या जागतिक परिषदेने या दिवसाचे औचित्य ठरवले. बांबू ही फक्त वनस्पती नसून रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि हरित अर्थव्यवस्थेचा अद्वितीय संगम आहे. कोकणातील मातीतून रुजत असलेला हा प्रयोग आज जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने आशादायी दिशा दाखवतो. भावेश कारेकर यांचा संघर्ष व बांबूप्रेम कोकणात हरित भविष्याची नवी बीजे रुजवत आहे.

