( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जयगड परिसरात तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असतानाच, राकेश जंगम बेपत्ता व खून प्रकरणातील हलगर्जीपणाची जबाबदारी ठरवत जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जयगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) कुलदीप पाटील यांची तात्काळ बदली पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवला होता. त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत “दोषींवर निश्चित कारवाई होईल” असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानंतरच ही ठोस कारवाई करण्यात आली. या संपूर्ण तपासाची सूत्रे अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे होती. तपासातून उघड झाले होते की, ६ जून २०२४ रोजी राकेश जंगमचा खून करून त्याचा मृतदेह आंबाघाट येथे टाकण्यात आला होता. चौकशीत मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने कबुली दिली असून, त्याच्यासोबत विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांची नावेही समोर आली आहेत. राकेश हा दुर्वास पाटीलच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून कार्यरत होता. २१ जून रोजी राकेशच्या आईने जयगड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
गेल्या वर्षभर पोलिसांच्या शोधमोहीमेनंतरही राकेशचा माग सापडला नव्हता. मात्र, मिरजोळे येथील भक्ती मयेकर हत्याकांडाच्या चौकशीतूनच राकेशच्या खुनाचा धागा मिळाला. या विलंबामुळे जयगड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी एपीआय कुलदीप पाटील यांच्या बदलीचा निर्णय घेतला. आता जयगड पोलिसांच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा कडक चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जयगड पोलिसांची निष्काळजी कार्यपद्धती उघड
जयगडमधील राकेश जंगम खून प्रकरणातील जयगड पोलिसांची निष्काळजी कार्यपद्धती उघड झाली. नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणाऱ्या पोलिसांनीच वर्षभर निष्क्रिय राहून तपासाची ढिलाई दाखवली, ही बाब अत्यंत संतापजनक आहे. राकेश जंगम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवूनही जयगड पोलिसांनी फक्त कागदोपत्री हालचाली केल्या. वर्षभर राकेशचा माग लागला नाही; उलट दुसऱ्या हत्याकांडाच्या तपासातून त्याचा खून उघडकीस आला. यावरून पोलिसांच्या तपासयंत्रणेची कार्यक्षमता किती ढिसाळ आहे, हे स्पष्ट झाले. जनतेचे रक्षकच गुन्हेगारांना पाठीशी घालतील तर गुन्हेगारांना भीती तरी कशी वाटणार? हा जनतेचा प्रश्न आज न्याय्यच ठरत आहे.
नागरिक कुणाकडे न्याय मागायला जाणार?
पत्रकारांनी उपस्थित केलेले सवाल , सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांनंतर एपीआय कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली, जिल्हा पोलिस अधीक्षकांचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. मात्र केवळ बदली ही शिक्षा नाही; ती तर जबाबदारी ढकलण्याचा सोपा मार्ग आहे. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. कारण पोलिस प्रशासनानेच आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर सामान्य नागरिक कुणाकडे न्याय मागायला जाणार? गुन्हेगारांना आवर घालायचा असेल, तर सर्वप्रथम पोलिस दलातील बेपर्वाई आणि बेफिकिरीवर लगाम घालावा लागेल. रक्षकच निष्काळजी ठरले, तर गुन्हेगारांना धाडस येते आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास डळमळतो. हा विश्वास परत मिळवणे हीच आज पोलिसांसमोरील खरी कसोटी आहे.

