(दापोली / सुदेश तांबे)
दापोली तालुक्यातील पालगड येथील रहिवाशी श्री.किरण दळवी यांच्या स्वमालकीच्या सलुनला व बाजूलाच असलेल्या जनरल स्टोरला ३० जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे ५ लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.
श्री.किरण दळवी हे रात्री नेहमीप्रमाणे आपले सलून बंद करून घरी गेले असता, काही वेळातच गावातील एका व्यक्तीने किरण दळवी यांच्या दुकानातून धूर येत असल्याचे किरण दळवी यांना सांगितले. सलून व जनरल स्टोअर घराजवळच असल्याने किरण दळवी यांनी लागलीच तिकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते.
ही घटना गावकऱ्यांना समजताच गावकरी मदतीसाठी धावले. गावातील काही गाडीवाल्यानी आपल्या गाडीतून लागलीच टाकी भरून पाणी आणले व आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र आगीच्या भयंकर ज्वाला पुढे कुणाचेच काही चालले नाही. अखेर काही वेळातच संपूर्ण दुकानाची राख रांगोळी झाली व होत्याचे नव्हते झाले.
सदर घटना कळताच दापोलीतून तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री.मंगेश शिंदे, तालुका सचिव श्री.शैलेश चव्हाण, तालुका खजिनदार श्री.प्रितम शिंदे, शहर अध्यक्ष श्री.योगेश दळवी, माजी अध्यक्ष श्री.महेंद्र चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन किरण दळवी व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.
या दुर्घटनेमध्ये सलूनचे तसेच लगत असलेल्या जनरल स्टोअर चे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. काही दिवसांपूर्वीच किरण दळवी यांनी सलून व्यवसायासाठी लागणारे मटेरियल तसेच जनरल स्टोअर चे सामान भरले होते.
या आगीमध्ये सलून खुर्च्या, आरसे, गिऱ्हाईक बसण्याचे आसन, इलेक्ट्रिक मशीन, वस्तरा, कैची, फणी, क्रीम व इतर सौंदर्यप्रसाधने, फ्रीज, पंखे, वीज मीटर तसेच रोख रक्कम, काही महत्वाची कागदपत्रे अश्या अनेक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत. ऐवढच न्हवे तर दुकानाच्या भिंतीवर बसविण्यात आलेल्या टाईल्स सुद्धा निखळून पडल्या. तर सिमेंट पत्रे जळून फुटले आहेत.
किरण दळवी यांच्या कुटुंबात आई, पत्नी व दोन लहान मुले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे किरण दळवी यांचा कुटुंबावर घाला आला आहे. त्यांचा रोजगारच पूर्णतहा ठप्प झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेमुळे ते उद्धस्थ झाले आहेत.