(कोल्हापूर)
स्वातंत्र्यपूर्व भारतात राष्ट्रजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या कर्नाटक दौऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडी या सीमावर्ती गावाला ऐतिहासिक भेट दिली होती. यावेळी त्यांच्या उपस्थितीत लोकसेवा संघाच्या इमारतीत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी टिळकांच्या हस्ते पूजलेले मखर आजही जपून ठेवले असून गेली १०८ वर्षे त्यावर विराजमान गणपती बाप्पांचं विधिवत पूजन होत आहे.
लोकसेवा संघ गणेशोत्सव मंडळ हे कोल्हापूर जिल्ह्यातील टिळकांनी प्रत्यक्ष भेट दिलेला एकमेव सार्वजनिक गणेश मंडळ मानले जाते. मंडळाने गेल्या अनेक दशकांत सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे.
इतिहासाची साक्ष देणारे व्यासपीठ
१३ नोव्हेंबर १९१७ रोजी लोकमान्य टिळकांनी कर्नाटक-महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार नागरिकांना गणेशवाडीत संबोधित केले होते. या सभेत त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, जातीनिर्मूलन आणि स्वराज्यासाठी संघटित चळवळ उभारण्याचे विचार मांडले. त्या ऐतिहासिक सभेच्या स्मृती म्हणून उभारलेले व्यासपीठ आजही गावात इतिहासाची साक्ष देत उभे आहे.
जैन समाजाचा सहभाग आणि देणगी
या दौऱ्यात जैन समाजाने टिळकांच्या स्वराज्य संघास १५ रुपयांची देणगी दिली होती. तसेच पान-सुपारीचा कार्यक्रम आयोजित करून टिळकांचे स्वागत करण्यात आले होते.
गेल्या १०८ वर्षांपासून गणेशवाडीतील लोकसेवा संघ गणेशोत्सव मंडळ परंपरेने गणेशोत्सव साजरा करत असून, विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्यही करत आहे. त्यामुळे या मंडळाला केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वाचे स्थान लाभले आहे.

