(मुंबई)
किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मल्ल्याला कडक शब्दांत जाब विचारत, “तू भारतात नेमका कधी परत येणार?” असा थेट प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न यापूर्वीही विचारण्यात आला होता. तोच मुद्दा पुन्हा अधोरेखित झाल्याने मल्ल्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
ही सुनावणी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखढ यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने मल्ल्याच्या वकिलांना विचारले की, फरार आर्थिक गुन्हेगार कायदा अंतर्गत मल्ल्याविरोधात कोणती नोटीस किंवा आदेश जारी करण्यात आला आहे का. यावर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी होकारार्थी उत्तर दिले. न्यायालयाने यावर मत नोंदवत, मल्ल्याशी संबंधित सर्व प्रकरणांची सुनावणी एकत्रितपणे होणे अपेक्षित होते, असे स्पष्ट केले.
मल्ल्याच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, या प्रकरणात आता परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. बँकांचे जवळपास संपूर्ण कर्ज वसूल झाले असून सुरुवातीचा सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा दावा व्याजासह १४ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेपर्यंत पोहोचला होता आणि ती रक्कम बँकांनी वसूल केल्याचा दावा करण्यात आला.
विजय मल्ल्या हे एकेकाळी देशातील नामवंत मद्यउद्योगपती आणि श्रीमंत उद्योजक म्हणून ओळखले जात होते. मात्र २०१६ साली ते भारत सोडून परदेशात गेले आणि त्यानंतर आजतागायत परतलेले नाहीत. त्याआधी २०१५ मध्ये सीबीआयने आयडीबीआय बँकेकडून किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी मल्ल्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
तपासात असा आरोप आहे की, किंगफिशर एअरलाइन्सचे अध्यक्ष असताना मल्ल्याने नियमांचे उल्लंघन करून कर्ज मिळवले आणि बँकांची फसवणूक केली. यानंतर एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहानेही स्वतंत्र तक्रार दाखल केली. या प्रकरणात कट रचना, विश्वासघात आणि मनी लॉन्ड्रिंगसारखे गंभीर आरोप मल्ल्यांवर आहेत.
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सुनावणीतही उच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली होती. मल्ल्या स्वतः न्यायालयासमोर हजर होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या याचिकांवर कोणताही दिलासा देता येणार नाही, असे कोर्टाने ठणकावून सांगितले होते. कायद्यापासून पळ काढणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

