महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस) अंतर्गत हिवाळी-२०२५ टप्पा-३ मधील पदवी, पदव्युत्तर व विद्यापीठ संलग्न अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा आज, शनिवार (दि. २० डिसेंबर) पासून सुरू होत आहेत. या परीक्षा १६ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून, राज्यभरातील १६६ परीक्षा केंद्रांवर सुमारे ८० हजार ८८४ विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या परीक्षा टप्प्यात वैद्यकीय, आयुष, नर्सिंग, पॅरामेडिकल, सार्वजनिक आरोग्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. पदवी स्तरावर बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएससी नर्सिंग (विविध सेमिस्टर), बीएएसएलपी, बीपीओ, बीपीटी (सीबीईएलपी) तसेच बीडीएस या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या व नव्या अभ्यासक्रमांनुसार विविध वर्षांच्या परीक्षांचा यात समावेश आहे.
पदव्युत्तर स्तरावर एमडी (होमिओपॅथी), एमएससी, तसेच विद्यापीठ संलग्न बीपीएमटी, फार्मास्युटिकल अभ्यासक्रम, एमपीएच (नर्सिंग), एमबीए, बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्थल्मिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, पीजी डीएमएलटी, सीसीएमपी, एमएमएसपीसी, एमपीएच आणि एमफिल या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.
परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन संगणक प्रणाली प्रभावीपणे अंमलात आणली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशीच थेट ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात येणार असून, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग व मूल्यमापनाची प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली.
एमयूएचएस हिवाळी-२०२५ टप्पा-३ अंतर्गत होणाऱ्या या परीक्षांमुळे राज्यातील वैद्यकीय व आरोग्य विज्ञान शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

