(मुंबई)
१२ सप्टेंबर रोजी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला होता. ही घटना समजताच शिवसैनिकांसह ठाकरें बंधूकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती . घटनेनंतर पुतळा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर लाल रंग फेकल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून, तो ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली. गुन्हा केल्याचे त्याने कबूलही केले आहे, अशी माहिती आहे.
श्रीधर पावसकर हा बाळासाहेब ठाकरे यांचा सुरक्षा रक्षक होता. काही कारणांमुळे त्याला काही वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. श्रीधर पावसकर चा भाऊ गुणाजी पावसकर असून, या गुणाजी पावसकरचा मुलगा उपेंद्र पावसकर आहे. उपेंद्र पावसकर यानेच रंग टाकल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर संतापाची लाट
घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. शिवसैनिकांनी मुंबईसह राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले.
राज ठाकरे यांनी, “२४ तासांत आरोपीला बेड्या ठोका.” असे म्हटले होते. तर उद्धव ठाकरे यांनी, “हे कृत्य लावारिस लोकांचे असू शकते. महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असू शकतो. स्वत:च्या आई वडिलांची लाज वाटते, अशा नराधमाने, बेवारस व्यक्तीने ही गोष्ट केली असावी किंवा बिहारमध्ये ज्या प्रकारे मोदींच्या आईचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला तसा महाराष्ट्र पेटवण्याचे काम कुणी करत असेल. आमच्या भावना तीव्र आहेत. आम्ही शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस या घटनेतील आरोपीचा शोध घेत आहेत, असे म्हटले आहे.”
ही घटना अतिशय निंदनीय आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला सोडले जाणार नाही. मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो असून मुख्यमंत्रीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.
अटक झाल्यानंतर आरोपीने चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा त्याने आरोप केला. तसेच दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी तो सातत्याने यायचा, असेही म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

