(मुंबई / वृत्तसंस्था)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौरी-गणपती विसर्जन सुरू असताना मुंबईत विजेच्या धक्क्याच्या दोन गंभीर घटनांनी हळहळ व्यक्त होत आहे. जोगेश्वरी पूर्वेतील श्याम नगर तलावाजवळील कृत्रिम विसर्जन तलावात १९ वर्षीय रोहित भीमसिंग राठोड याला विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. विसर्जनासाठी उभारलेल्या ठिकाणी पाण्यात वीज प्रवाह कसा उतरला, विद्युत यंत्रणेत काही बिघाड झाला होता का आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी राहिल्या का, याबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
जोगेश्वरी पूर्वेतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलजवळील श्याम नगर तलाव परिसरात गणेशोत्सवानिमित्त कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी गौरी-गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याच वेळी रोहित राठोड हा १९ वर्षीय तरुण विसर्जनासाठी तेथे आला होता. विसर्जनाची प्रक्रिया सुरू असताना तलावातील पाणी किंवा परिसरातील विद्युत यंत्रणेतून वीज प्रवाह उतरल्याची घटना घडली. पाण्यात असलेल्या रोहितला अचानक जोरदार विजेचा धक्का बसला आणि या दुर्घटनेत तो गंभीररीत्या भाजला.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी रोहितला तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. रोहित हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे यापूर्वीच निधन झाले होते. घरातील एकमेव मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या वृद्ध वडिलांवर मोठे संकट कोसळले आहे. रुग्णालयाच्या परिसरात मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. गणेशोत्सवाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे जोगेश्वरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर रोहितचे चुलत भाऊ आणि नातेवाईक संतप्त झाले आहेत. विसर्जनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार असताना विद्युत सुरक्षेची पुरेशी तपासणी करण्यात आली होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कृत्रिम तलावाच्या परिसरात वीज प्रवाह नेमका कसा आला, विद्युत यंत्रणेत काही बिघाड झाला होता का किंवा सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी राहिल्या का, याची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून तलावात वीज कशी उतरली आणि दुर्घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, मुंबईतील काळाचौकी परिसरातही गणेशोत्सवादरम्यान विजेच्या धक्क्याची गंभीर घटना घडली. दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाजवळील मंडपाच्या प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या तात्पुरत्या कोल्ड्रिंक स्टॉलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत ८ वर्षीय रागिणी घनश्याम यादव आणि ३३ वर्षीय सुजाता यांचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य चार जण जखमी झाले असून, त्यापैकी १२ वर्षीय रुही सिंह हिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.


