(ठाणे)
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ येथील शासकीय मुलींच्या बालसुधारगृहातून सहा अल्पवयीन मुली पलायन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) उघडकीस आली. या सहा मुलींमध्येल्या २ मुलींचा शोध लागला असून उर्वरित ४ मुलींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिली आहे.
मुख्य दरवाज्याची चावी वापरून पलायन
ही घटना बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक तपासात समोर आले की, मुलींनी कोणत्या तरी मार्गाने मुख्य प्रवेशद्वाराची चावी मिळवली, आणि सुरक्षारक्षक जेवणासाठी गेले असताना गेट उघडून पलायन केले. या घटनेमुळे शासकीय बालसुधारगृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात सुधारगृह प्रशासनाच्या तक्रारीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन मुली सापडल्या, चौघींचा शोध सुरू
पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले असून, पोलिसांनी दोन मुलींना मिरा-भाईंदर येथील त्यांच्या घरी सापडवले. त्या दोघींनी दिलेल्या जबाबात, “आम्हाला बालसुधारगृहात राहायचे नाही,” असे स्पष्ट केले आहे. या सहा मुली मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसरातील रहिवासी आहेत. अद्यापही पळून गेलेल्या ४ मुलींचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच शोधून काढले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह
घटनेच्या दिवशी मुलींच्या पलायनाच्या वेळी सुरक्षा रक्षक जेवणासाठी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. हे दुर्लक्ष घडलेल्या घटनेचे एक मुख्य कारण मानले जात आहे. यामुळे बालसुधारगृहातील सुरक्षेची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली जाते का, याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.

