(नवी दिल्ली)
अमेरिकेने पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का देत, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ही घोषणा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केली. TRF ही पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी संघटना असून, २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील बैसरन व्हॅली येथे झालेल्या भयानक हल्ल्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. या हल्ल्यात अतिरेक्यांनी हिंदू धर्मीय पर्यटकांना निवडून त्यांची हत्या केली होती. या घटनेत गोळ्या घालून २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या राक्षसी कृत्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. अमेरिकेच्या या निर्णयामुळे TRF च्या सर्व आर्थिक स्रोतांवर निर्बंध, मालमत्ता जप्ती आणि सर्व व्यवहारांवर बंदी लागू होणार आहे.
TRF – लष्कर-ए-तैयबाची छुपी शाखा
TRF ही लष्कर-ए-तैयबाची फूट शाखा असून, ती पाकिस्तानमधून कार्यरत आहे. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेवर आधीच संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातली आहे. TRF चे उद्दिष्ट जम्मू-काश्मीरमधील अस्थिरता वाढवणे आणि भारतातील नागरिकांवर हल्ले करणे हे आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी म्हटले की, “TRF ला दहशतवादी संघटना घोषित करणे ही ट्रम्प प्रशासनाची राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठीची महत्त्वपूर्ण पावले आहेत. हे भारतातील पहलगाम हल्ल्यासारख्या गुन्ह्यांमध्ये न्याय मिळवून देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
दहशतवादाविरोधातील आघाडीत भारतासोबत अमेरिका
TRF वर बंदी आणून अमेरिका पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील लढ्यात भारतासोबत असल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. २००८ मधील मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतावर झालेला हा सर्वात गंभीर दहशतवादी हल्ला असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.