(गुहागर / सचिन कुळये)
तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असताना त्यावरून जात असलेली सुमारे १५ गुरे पुलाखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला आहे. तर इतर जनावरे लोखंडी गर्डरखाली अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
घटना घडताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असून पुलाचे जड लोखंडी साहित्य जनावरांवर कोसळल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. ग्रामस्थ नदीत उतरून जनावरांना वाचविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लोखंडी संरचना हटविल्याशिवाय अनेक जनावरांना बाहेर काढणे कठीण होते.
दोन वाड्यांमधील ३० ते ४० ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालत नदीपात्रात कोसळलेला लोखंडी साकव बाजूला करून त्याखाली अडकलेल्या गुरांना बाहेर काढण्यात यश मिळवले. या दुर्घटनेत दिलीप गुरव (लिंगायत) यांचा एक बैल दगावला असून, १५ गुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यापैकी सात गुरे जखमी झाली आहेत.
नित्यनेमाप्रमाणे दिलीप गुरव, शत्रुघ्न खेतले, सुरेश खेतले आदी ग्रामस्थांची गुरे या साकवावरून नदीपलीकडे गेली होती. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास गुरे याच साकवावरून परतत असताना अचानक लोखंडी साकव तुटला आणि नदीपात्रात कोसळला. त्यावेळी साकवावर असलेली गुरेही नदीत कोसळली.
साकव नदीपात्रात पडल्याने काही गुरे त्याखाली पाण्यात अडकली. दुर्घटनेची माहिती मिळताच गावठाणवाडीसह लगतच्या आणखी एका वाडीतील ३० ते ४० ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नदीपात्रात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी होते, तसेच पाण्याच्या प्रवाहालाही वेग होता. तरीही ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता साकवाखाली अडकलेल्या गुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर १५ गुरांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र या दुर्घटनेत दिलीप गुरव यांचा एक बैल दगावला. तसेच शत्रुघ्न गणपत खेतले यांची पाच, सुरेश राजाराम खेतले यांची एक आणि मारुती भिवाजी खेतले यांची एक अशी एकूण सात गुरे जखमी झाली आहेत.
दरम्यान, या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र, पर्यायी व्यवस्था पूर्ण होण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला देण्यात आली. संबंधित अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून, बचावकार्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि जेसीबी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पुलाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, हा लोखंडी पूल भरपूर वर्षांपूर्वी बांधलेला असून सध्या जीर्ण झाला होता होता. काही दिवसांपूर्वीच पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नवीन पुलासाठी प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू होती आणि अधिकारी नुकतीच पाहणी करून गेले होते.
हा पूल गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग होता. नागरिक, शेतकरी तसेच जनावरे यांची नियमितपणे या पुलावरून ये-जा सुरू होती. गावाच्या पलीकडे असलेल्या शेतीकडे जाण्यासाठी तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठीही याच पुलाचा वापर केला जात होता. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने संपूर्ण गाव या पुलावर अवलंबून होते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पूल यापूर्वीही धोकादायक स्थितीत आला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबीच्या साहाय्याने पुलाचा भाग उचलून वेल्डिंग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही वेळेत न झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

