(लांजा)
लांजा शहरातील आयटीआय समोर शनिवारी रात्री घडलेल्या दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रात्री सुमारे ८.४५ च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश शिवराम जाधव (वय ४५, रा. तोणदे बौद्धवाडी, सध्या रा. परटवणे, अशोक नगर, ता. जि. रत्नागिरी) हे त्यांच्या पॅशन प्रो दुचाकी (क्रमांक MH-08-AT-8671) ने तोणदेहून लांजा येथे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या आशिष संदीप घडशी (वय २२, रा. कुर्णे घडशीवाडी, ता. लांजा) याने त्याच्या होंडा अॅक्टिवा (क्रमांक MH-08-AW-0091) या दुचाकीने शैलेश जाधव यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली.
अपघातानंतर शैलेश जाधव रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत जाधव यांना रुग्णवाहिकेने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अपघातात आशिष घडशी किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान, वेगाने, हयगयीने आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवून शैलेश जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आशिष घडशी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 106(2), 281, 125(अ), 125(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.