(मुंबई)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात ते रत्नागिरीत पक्षाचा नवा चेहरा जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. वैभव खेडेकर यांच्या हकालपट्टीनंतर कोकणातील मनसेच्या नेतृत्वाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मनसेच्या कोकणातील संघटनेची धुरा वैभव खेडेकर यांच्या खांद्यावर होती. राज ठाकरे यांनी त्यांना निवडणुकीत उमेदवारीसह नेतृत्वाची संधी दिली होती. मात्र, काही दिवसांपासून खेडेकर पक्षात अस्वस्थ होते. हे लक्षात घेत, त्यांनी मनसे सोडण्याआधीच राज ठाकरेंनी त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर कोकणातील मनसेचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याची चर्चा रंगली होती.
अलीकडेच शिवतीर्थ येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी कोकणातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसैनिकांच्या अडचणी जाणून घेतल्या, आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी बूथस्तरावर काम करण्याचे आदेश दिले. तसेच, वैभव खेडेकर यांच्या निर्गमनानंतर पक्षसंघटनेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची ग्वाहीही या बैठकीत देण्यात आली.
मनसेने आतापासूनच संघटनात्मक तटबंदी सुरू केली आहे. खेडेकर यांचा भाजपा प्रवेश अपेक्षित आहे. ते भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच यावर प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता नवरात्रोत्सवानंतरच्या दौऱ्यात राज ठाकरे मनसेचा कोकणातील ‘नवा कॅप्टन’ कोणाला बनवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

