(नवी दिल्ली)
दिल्लीत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे सोपवण्यात आला असून, तपासाला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या आपत्कालीन बैठकीत हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्राथमिक तपासात दिल्ली बॉम्बस्फोटाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले असून, या घटनेचा तुर्कीशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. आरोपी डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्टवरून त्यांनी अलीकडेच तुर्कीला प्रवास केल्याचे उघड झाले आहे. तुर्की दौर्यादरम्यान त्यांनी कोणाशी संपर्क साधला, याचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, बुधवारी झालेल्या केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत बॉम्बस्फोटांचा तीव्र निषेध करण्यात आला आणि हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत सुरक्षा संस्थांचे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आले. मंत्रिमंडळाने या हल्ल्याची तातडीने आणि व्यावसायिक तपासणी करण्याचे निर्देश दिले असून, गुन्हेगार, त्यांच्या साथीदारांपर्यंत आणि पाठीराख्यांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात सुमारे अर्धातास स्वतंत्र चर्चा झाली. या बैठकीत देशाच्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, फरिदाबाद पोलिसांनी लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार (क्रमांक DL 10 CK 0458) खंदावली गावाजवळून जप्त केली आहे. ही कार प्रमुख संशयित उमर उन नबी ऊर्फ उमर मोहम्मद यांच्या नावावर खरेदी केल्याचे समोर आले असून, सध्या तिचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली स्फोटाची योजना गेल्या काही दिवसांपासून आखली जात होती. प्राथमिक चौकशीतून असे स्पष्ट झाले आहे की लाल किल्ला हे हल्लेखोरांचे मुख्य लक्ष्य नव्हते; त्यांची योजना यापेक्षाही कितीतरी अधिक भयंकर होती. आरोपींचे उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांचे नुकसान करण्याचे होते, आणि त्यांचे खरे टार्गेट अयोध्या व काशीतील धार्मिक स्थळे होती, अशी माहिती समोर आली आहे.
तपासात असेही समोर आले आहे की दिल्लीतील स्फोट घाईघाईत झाला, कारण आरोपींना भीती होती की त्यांचा कट उघड होऊ शकतो. या स्फोटात वापरलेले स्फोटक साहित्य बांगलादेश आणि नेपाळमार्गे भारतात आणण्यात आले, असेही प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
हल्ला होण्याआधीच मोठी धरपकड
या स्फोटापूर्वी काही तास आधीच पोलिसांनी ८ संशयितांना अटक केली होती, त्यात ३ डॉक्टरांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २,९०० किलो स्फोटक साहित्य, अमोनियम नायट्रेट, डिटोनेटर आणि इतर रासायनिक पदार्थ जप्त केले.
अटक झालेल्यांमध्ये फरीदाबाद येथील अल फला युनिव्हर्सिटीतील डॉ. मुज्जम्मिल गनई आणि डॉ. शहीन सईद यांचा समावेश आहे. शहीन सईद ही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची महिला भरती प्रमुख असल्याचा आरोप आहे. विविध ठिकाणांहून अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून उघड झाले की काशी आणि अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली होती.
या कटाचा एक स्लीपर मॉड्यूल आधीच सक्रिय करण्यात आले होते. आरोपी शहीनने अयोध्येत या मॉड्यूलची जबाबदारी घेतली होती. मात्र, हल्ल्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी ही कारवाई उधळून लावत सर्वांना अटक केली आणि स्फोटके जप्त केली, त्यामुळे मोठा दहशतवादी हल्ला टळला.

