(मुंबई)
मुंबईजवळील काशिमीरा परिसरात पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट एका 41 वर्षीय अभिनेत्रीच्या माध्यमातून चालवले जात होते. पोलिसांनी अभिनेत्रीच्या तावडीतून दोन महिला कलाकारांची सुटका केली असून त्यांना आश्रयगृहात पाठवले आहे.
हे रॅकेट मुख्यतः उच्चभ्रू ग्राहकांसाठी कार्यरत होते. अटक झालेल्या अभिनेत्रीचे नाव अनुष्का मोनी मोहन दास असून ती या रॅकेटमध्ये दलालीची भूमिका बजावत होती. सुटका करण्यात आलेल्या महिलांनी बंगाली चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
कसा रचला सापळा?
गेल्या काही दिवसांपासून पोलीस या रॅकेटवर लक्ष ठेवून होते. गुप्त माहितीच्या आधारे दोन बनावट ग्राहक तयार करण्यात आले. आरोपींनी त्यांना काशिमीरा येथील एका मॉलमध्ये बोलावले. पोलिसांनी आधीच सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे अभिनेत्री ग्राहकांना भेटायला आली आणि पैसे स्वीकारताच पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले. सध्या आरोपी अभिनेत्रीला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर दलाल आणि संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू आहे.
सिनेसृष्टीतील काळं जग उजेडात
या कारवाईनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यामागील काळं जग समोर आले आहे. वेश्या व्यवसायासारख्या गंभीर गुन्ह्यात एका अभिनेत्रीचा सहभाग उघड झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांचा तपास पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

