(मुंबई )
राज्य सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठीचे भाडेदर सोमवारी जाहीर केले. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे १५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १० रुपये २७ पैसे दर आकारला जाईल. हा निर्णय तात्काळ अमलात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन प्राधिकरणाने उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. आणि अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या तीन कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रात इलेक्ट्रिक बाईक-टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी तात्पुरता परवाना मंजूर केला आहे. हा परवाना ३० दिवसांचा असून, त्यानंतर कंपन्यांनी अंतिम परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी आणि शर्ती मान्य केल्यानंतरच त्यांना कायमस्वरूपी परवाना देण्यात येईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सीमुळे वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला.

