(नवी दिल्ली)
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंगचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहेत. आता रेल्वे आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत फक्त आधार व्हेरिफिकेशन पूर्ण केलेल्या युजर्सना ऑनलाईन तिकीट बुक करता येईल. हा नियम आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर लागू होणार आहे.
आधीच तत्काळ तिकिटांसाठी लागू नियम
१ जुलैपासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले होते. आता हा नियम नियमित ऑनलाईन आरक्षणासाठीही लागू करण्यात आला आहे. रेल्वेनुसार, काही एजंट सॉफ्टवेअरच्या मदतीने सुरुवातीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक करत असल्याने सामान्य प्रवाशांना अडचणी येत होत्या. नव्या नियमानुसार प्रवाशांना एजंटपेक्षा प्राधान्य मिळणार आहे.
रिझर्वेशन काउंटरवर कोणताही बदल नाही
रिझर्वेशन काऊंटरवर तिकीट बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. आधीप्रमाणेच आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत अधिकृत एजंट तिकिटे बुक करू शकणार नाहीत. त्यामुळे पहिल्या १५ मिनिटांत आधार व्हेरिफिकेशन केलेले युजर्स आणि त्यानंतर सामान्य प्रवाशांना एजंटपेक्षा अधिक प्राधान्य मिळेल.
पारदर्शकतेकडे पाऊल
रेल्वेच्या या निर्णयामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंग अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल. एजंटमुळे कन्फर्म तिकीट मिळण्यात येणाऱ्या अडचणींवर यामुळे मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

