(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी ते चाफे या मुख्य मार्गावरील निवेंडी प्राथमिक शाळा आणि हनुमान मंदिरासमोरील रस्त्याच्या कड्याचा मोठा भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या मार्गावरून दररोज एसटी बससह लहान-मोठ्या खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याच रस्त्यालगत निवेंडी प्राथमिक शाळा असल्याने विद्यार्थ्यांचीही नियमित ये-जा सुरू असते. वाहनांना साईड देताना विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेला चालावे लागते. मात्र, रस्त्याचा कडा खचल्याने अपघाताचा धोका वाढला असून पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रस्ता अरुंद झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडे-झुडपांमुळे दृश्यमानता कमी झाली असून पावसाळ्यात धोका अधिक वाढला आहे. अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडांची छाटणी किंवा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर समस्येकडे सामाजिक कार्यकर्ते उमेश कदम यांनी लक्ष वेधले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, वेळेत दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या धोकादायक रस्त्याची तातडीने दखल घेऊन खचलेला भाग दुरुस्त करावा, तसेच रस्त्यालगतची झाडे-झुडपे हटवून विद्यार्थी आणि वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

