(रत्नागिरी)
पाच महिन्यांच्या बालकाला ताप आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयामधून उपचारांसाठी कोल्हापूर येथे नेत असतानाचा वाटेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३१ जानेवारी रोजी घडली. मयूरेश जनू जांगळी (रा. मुर्शी – भेडींचा माळ, संगमेश्वर) असे बालकाचे नाव आहे.
याबाबत त्याच्या आजोबांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूरेश याला ताप आल्याने त्याला साखरपा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्याला कोल्हापूर येथे नेण्यास सांगण्यात आले.
तातडीने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथे नेत असतानाच त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे रुग्णवाहिका पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी देवरूख पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आरोग्य यंत्रणेत सुधारणा आवश्यक
एखाद्या रुग्णाला ग्रामीण स्तरावरून जिल्हा स्तरावर आणले जाते. तिथून पुन्हा कोल्हापुरात हलविण्याची गरज भासते. यामधून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमजोर असल्याचे प्रदर्शन घडते. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ही आणखी सक्षम करण्याची तसेच सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.