(राजापूर / तुषार पाचलकर)
‘ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबलीच पाहीजे’, ‘ओबीसींनी न्याय मिळाला पाहीजे’,‘ ओबीसींना आरक्षणापासून बेदखल करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’ अशा जोरदार घोषणाबाजी करीत मोठ्यासंख्येने जमा झालेल्या तालुक्यातील ओबीसी बांधवांनी आज ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला. यावेळी ओबीसी समाजाच्यावतीने मुख्यमंत्र्यांसह शासनाला निवेदनही देण्यात आले. त्या निवेदनाद्वारे मराठा समाजाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ओबीसींमध्ये समावेश करण्यास आमचा ठाम विरोध असल्याचे सूचित करण्यात आले.
शासनाला देण्यात आलेले निवेदन निवासी नायब तहसिलदार श्री. सरफरे यांनी स्विकारले. यावेळी ओबीसी जनमोर्चा राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, कुणबी समाजोन्नती संघ शाखा राजापूरचे अध्यक्ष दिपक नागले, ओबीसी संघर्ष समिती राजापूरचे अध्यक्ष महेश शिवलकर, अॅड. शशिकांत सुतार, चंद्रकांत जानस्कर, प्रकाश मांडवकर, मारूती खेडस्कर, राजेश गुरव, सौरभ खडपे, योगेश नकाशे, मनोहर गुरव, तुकाराम कुडकर, नाना कोरगावकर, जितेंद्र पाटकर, श्रीकांत राघव, सत्यवान कणेरी, अशोक सक्रे, अर्जुन लांजेकर, अरविंद लांजेकर, सुरेश ऐनारकर, सुबोध पवार, अॅड. महेश नकाशे, अॅड. प्रविण नागरेकर, सावित्री कणेरी, रामचंद्र रांबाडे, प्रकाश गराटे, सुरेश सूद, प्रतिक मटकर, चंद्रकात पड्यार यांच्यासह मोठ्यासंख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
तहसिलदारांना निवेदन देण्यापूर्वी ओबीसी जनमोर्चा राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. बावकर यांसह श्री. मांडवकर यांनी मार्गदर्शन केले. हैद्राबाद गॅजेटीअरमधील नोंदी विचारात घेवून मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय झालेला आहे. या निर्णयाद्वारे ओबीसींना आरक्षणापासून बेदखल करण्याचा प्रकार असून तो कुणबी जातीसह ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे. ओबीसींना आरक्षणापासून बेदखल करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नसून ही घुसखोरी थांबलीच पाहीजे अशी आग्रही मागणी ओबीसी समाजबांधवांच्यावतीने निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली.
तहसिलदारांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र नापसंती
तालुक्यातील ओबीसी समाजातर्फे विविध मागण्यांचे आज शासनाला निवेदन येथील तहसिलदार कार्यालयामध्ये देण्यात आले. यावेळी राजापूरचे तहसिलदार यांनी स्वतः उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, आजच्यासह यापूर्वीही ओबीसी समाजातर्फे निवेदन देताना ते स्वतः उपस्थित राहीलेले नाहीत. याकडे सार्यांचे लक्ष वेधत कुणबी समाजोन्नती संघ शाखा राजापूरचे अध्यक्ष दिपक नागले यांच्यासह ओबीसी समाज नेत्यांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ओबीसी समाजाकडे प्रशासनाकडृून होत असलेला दुर्लक्ष यापुढे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

