(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील चवे बौद्धवाडी येथील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेच्या ज्येष्ठ महिला सदस्या निर्मला शंकर यादव यांचे रविवार दिनांक ३१ ऑगस्ट२०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या.
वरची निवेंडी बौद्धवाडी येथील माता रमाई आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि वरची निवेंडी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तसेच बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा येथील महिला मंडळाच्या कार्यकर्त्या योगिता दिनेश कदम यांच्या त्या मातोश्री होत. तर वरची निवेंडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १८ वरची निवेंडी भीमनगर चे माजी अध्यक्ष तथा बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळ्याचे माजी उपाध्यक्ष, धार्मिक, सामाजिक कामकाजातील सक्रिय व्यक्तिमत्व दिनेश सुधाकर कदम यांच्या त्या सासूबाई होत.
त्या अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आपल्या आयुष्यात काबाडकष्ट करून त्यांनी चांगल्या प्रकारे संसाराचा गाडा हाकला. तसेच त्यांनी समाजातील धार्मिक आणि सामाजिक कामकाजात आपले योगदान महिला मंडळाच्या माध्यमातून दिले होते. त्यांच्या पश्चात पती शंकर कान्हा यादव, मुलगा मंगेश शंकर यादव, मुली नंदिनी प्रभाकर मोहिते, वनिता वसंत मोगरे, सुनीता सुनील कांबळे, योगिता दिनेश कदम असा परिवार तसेच नातवंडे व जावई आणि अन्य सर्व यादव परिवार आहे.
कालकथित निर्मला यादव यांचा जलदान विधी आणि शोकसभा कार्यक्रम चवे बौद्धवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. त्यांच्या निधनाप्रसंगी चवे बौद्धवाडी येथील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेच्या वतीने आणि त्यांच्या नातेवाईक मंडळींच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

