(दापोली)
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा दापोलीच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी श्री मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप देवळेकर यांनी म्हटले की, “सर्व शिक्षकांना TET परीक्षा देणे बंधनकारक करण्याच्या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ देशपातळीवर लढा उभारणार आहे. २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET देण्याची आवश्यकता राहणार नाही, यासाठी आम्ही ठामपणे प्रयत्न करत आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यात पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी, NMMS शिष्यवृत्तीधारक, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी, नासा/इस्रो भेट पात्र विद्यार्थी, VDS परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी, तसेच चौथी व सातवी RTS परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच जिल्हा परिषद आदर्श शाळा, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी केले. सूत्रसंचालन संदेश चव्हाण व प्रमोद जाधव यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा सरचिटणीस भालचंद्र घुले, शिक्षक नेते रमाकांत शिगवण, राज्य संयुक्त चिटणीस प्रवीण काटकर, चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश सावर्डेकर, खेड अध्यक्ष राजेंद्र बेलोसे, जिल्हा महिला प्रमुख क्षमा गावकर, मानसी सावंत, कविता कोराणे आदींचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली, असे तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी सांगितले.

