(जाकादेवी / वार्ताहर)
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित यावर्षीच्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत जांभरुण गावच्या शिंदे कुटुंबियांनी साकारलेल्या जागतिक वारसा स्थळ म्हणून यावर्षी युनेस्कोने जाहीर केलेल्या बारा किल्ल्यांच्या देखाव्याला रत्नागिरी तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला. मराठा भवन रत्नागिरी येथे डॉ. उदय सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
शिंदे कुटुंबीय प्रतिवर्षी गणेशोत्सव देखाव्यामध्ये विविध धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक प्रबोधनपर तसेच जनजागृती करणाऱ्या विषयांचे सादरीकरण करत असते. याच देखाव्याला कांचन डिजिटल समूह रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित सजावट स्पर्धेतही पारितोषिक प्राप्त झाले आहे.
शिंदे कुटुंबीयांची मेहनत आणि यशाबद्दल जांभरुण गावातून तसेच पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.

