(नाशिक / प्रतिनिधी)
समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाज परिवर्तनासाठी आणि देश, धर्म, संस्कृती रक्षणासाठी श्री स्वामी महाराजांची शक्तिशाली ऊर्जा घराघरात पोहोचवा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा उपस्थित समर्थ सेवेकर्यांनी टाळ्यांचा कडकडाट आणि स्वामीनामाचा जयघोष केला.
राष्ट्रहित आणि जनकल्याणासाठी गुरुपीठात शनिवारी (१३सप्टेंबर) घेण्यात आलेल्या गुरुचरित्र पारायणात ४७५ जणांनी तर रविवारी (१४ सप्टेंबर ) घेण्यात आलेल्या नवनाथ भक्तिसार पारायणात ३६०० सेवेकर्यांनी आनंदाने सहभाग घेतला. शनिवारी झालेल्या साप्ताहिक सत्संगात परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, सेवामार्गातर्फे सामाजिक सद्भावना जोपासली जाते. लोकांचे दुःख दूर करण्याचे कार्य केले जाते. देश,धर्म,संस्कृती रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.आज आपण पाहतो आहोत की, आपल्या शेजारच्या देशामध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्ती असो किंवा अराजकता असो त्यामुळे देशाचे नुकसान होते. अशा कोणत्याही आपत्ती पासून देश संरक्षित राहावा आणि जनतेच्या रक्षणाबरोबरच त्यांचे कल्याणही व्हावे हीच सेवामार्गाची भूमिका आहे. त्यामुळेच अब्जचंडी, गुरुचरित्र आणि नवनाथ पारायणासारख्या शक्तिशाली सर्वोच्च सेवा सामुदायिकपणे घेतल्या जातात असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवरायांचा जीवनादर्श अंगीकारा..
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून लोकोत्तर कार्य केले. त्यांचा तेजस्वी, गौरवशाली अन् पराक्रमी इतिहास इयत्ता पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व अभ्यासक्रमात समाविष्ट झाला पाहिजे. शिवरायांचा जीवनादर्श प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. ज्यांना शिवराय खरोखर कळले त्यांनी आपल्या शक्तीचा, ताकदीचा उपयोग समाजकार्यासाठी करावा असे स्पष्ट मतही गुरुमाऊलींनी नोंदविले.
बारा लक्ष जप आणि गाणगापूरचा सत्संग..
सेवामार्गाचा मासिक सत्संग २५ ऑक्टोबर २०२५ रोजी गाणगापूर येथील दत्तधामात होणार आहे. या मासिक सत्संगाला येताना सेवेकर्यांनी श्री स्वामी समर्थ हा बारा लक्ष जप लिहिलेल्या वह्या सोबत आणून जमा कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले. सेवामार्गाच्या बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभागातर्फे गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या एक कोटी गणपती अथर्वशीर्ष पठणाच्या उपक्रमालाही ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. साप्ताहिक सत्संगाला गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे, श्री. नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.

