(मंडणगड / प्रतिनिधी)
दुचाकीवरील वेग, प्रवासाची आवड आणि आत्मविश्वासाची ताकद यांचे सुंदर मिश्रण साकार करत मंडणगड शहरातील निखील चंद्रकांत पिंपळे या बाईकप्रेमी रायडरने पुन्हा एकदा अनोखा पराक्रम साधला आहे. ऑक्टोबर ११ ते २३ या केवळ तेरा दिवसांच्या कालावधीत त्यांनी आंबडवे (तालुका मंडणगड) ते नेपाळ आणि परतीचा ५२५० किलोमीटरचा आंतरराष्ट्रीय सोलो बाईक प्रवास पूर्ण केला. या अनोख्या कामगिरीने निखील यांनी तालुक्याच्या नकाशावर आपले नाव तेजोमय केले आहे.
सुरुवातीपासूनच ‘सोलो बाईकिंग’ची आवड जोपासणाऱ्या निखील यांनी यापूर्वी उत्तराखंड, गोवा, जम्मू-काश्मीर, लेह-लडाख अशा दुर्गम भागांत स्वतःच्या दुचाकीवरून स्वतंत्र प्रवास केला आहे. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना देखील त्यांची उर्मी, फिटनेस आणि मनोबल तरुणाईला लाजवणारे आहे. वय आणि आरोग्याच्या मर्यादा निखील यांच्या उत्साहापुढे क्षुल्लक ठरल्या. शुगर, बीपीसारख्या आजारांशी झुंज देत, दोन शस्त्रक्रिया पार केल्यावरही त्यांनी शरीर आणि वाहन दोन्हींची काटेकोर काळजी घेत हा अवघड प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या या यशामागे उच्च मनोबल, शिस्तबद्ध नियोजन आणि जिद्दीचा ध्यास यांचा मोठा वाटा आहे.
पिंपळे कुटुंब हे मूळचे दापोली तालुक्यातील आहेत. ऐंशीच्या दशकात निखील यांचे वडील मंडणगड येथे स्थायिक झाले. त्यांनी चित्रपट प्रदर्शन व साऊंड सिस्टीम व्यवसायातून स्थानिक लोकांचे मनोरंजन साधत आपला चरितार्थ उभारला. त्याच व्यवसायाला निखील यांनी नवे आयाम दिले आणि त्याचबरोबर काळानुरूप नवीन वाटा शोधल्या. उच्चशिक्षित असलेल्या निखील यांनी विमा प्रतिनिधी म्हणून करिअरची सुरुवात केली, त्यानंतर स्टेशनरी व शालेय वस्तूंच्या व्यवसायात पाऊल ठेवले. आज त्यांचे दुकान तालुक्यातील नामांकित व्यावसायिक केंद्रांपैकी एक मानले जाते. आजच्या स्पर्धात्मक काळात झटपट यशासाठी शॉर्टकट शोधणाऱ्या तरुण पिढीसाठी निखील आणि त्यांचा भाऊ सनी पिंपळे हे प्रेरणादायी उदाहरण आहेत. त्यांनी प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या आधारावरच आपला प्रवास घडविला. विपरीत परिस्थितीतही स्थैर्य राखून, स्वकष्टावर उभं राहण्याचा धडा या भावंडांनी दिला आहे.
पिंपळे कुटुंबावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतेच्या आणि समतेच्या विचारांचा ठसा कायम आहे. निखील यांच्या आजी महाड येथील ऐतिहासिक ‘चवदार तळे सत्याग्रहात’ सहभागी झालेल्या होत्या, तर त्यांचे मामा विजय पोटफोडे हे देशपातळीवरील समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. या विचारसरणीची प्रेरणा घेत निखील यांनी आपला नेपाळ प्रवास बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी आंबडवे येथूनच प्रारंभ केला. बाबासाहेबांना मानवंदना अर्पण करत त्यांनी या आंतरराष्ट्रीय सवारीला सुरुवात केली आणि प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करून तालुक्याच्या इतिहासात आपले नाव कोरले.
आवड, आत्मविश्वास आणि प्रेरणा यांचा संगम
दुचाकी प्रवास केवळ छंद नाही, तर आत्मविश्वासाचा आणि शिस्तीचा प्रवास आहे, हे निखील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. ‘वय हे फक्त आकडा आहे’ याचे खरे उदाहरण त्यांच्या सोलो बाईक सफरीतून दिसून येते. मंडणगडसारख्या छोट्या तालुक्यातूनही मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी त्यांची ही कामगिरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

