(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील ओणी–पाचल–अनुस्कुरा मार्ग हा तालुक्यातील महत्त्वाचा संपर्कमार्ग. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या काळात तब्बल चार वेळा खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. पण फक्त खडी टाकून केलेल्या मलमपट्टीमुळे काही दिवसांतच रस्ता पूर्ववत खड्डेमय झाला आणि प्रवाशांचे हाल जसजसेच्या तसे राहिले आहेत.
सणासुदीच्या दिवसांत गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना या खड्डेमय रस्त्यांचा त्रास अधिक सहन करावा लागला. रस्त्यावरच्या खड्यांमुळे प्रवासात होणारा विलंब, अपघातांचा धोका आणि दैनंदिन हालअपेष्टा यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर पाचल आणि परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्रव्यवहार करून 17 सप्टेंबर रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. इशाऱ्यानंतर विभागाने पुन्हा एकदा मलमपट्टीचे काम सुरू केले. मात्र, केवळ खडी टाकून खड्डे बुजविण्याची ही जुनी पद्धत पाहून ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले आहेत.

ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे की, ओणी–पाचल–अनुस्कुरा तसेच पाचल–जवळेथर मार्गावरील सर्व खड्डे कायमस्वरूपी दुरुस्त करण्यात यावेत आणि डांबर टाकून रस्ता सुरक्षित करण्यात यावा. अन्यथा 17 सप्टेंबरला पाचल बाजारपेठेत होणारे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार जागं करण्यापेक्षा आपणच ठाम आणि एकत्रितपणे उभे राहून यांना जागं आणुया. त्यामुळे 17 तारखेला आंदोलन छेडणे आता अपरिहार्य झाले आहे. ग्रामस्थांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे विभागाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर 17 सप्टेंबरला पाचल बाजारपेठ आंदोलनाचे रणांगण बनेल, हे आता निश्चित झाले आहे.

