(नवी मुंबई)
नवी मुंबईतील उलवे परिसरात राहणारे पोलीस हवालदार स्वप्निल लोहार (नियुक्ती – सानपाडा पोलीस स्टेशन) यांनी ११ सप्टेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली. सुवर्णपदक विजेता आणि पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ पोलीस असलेल्या स्वप्निल लोहार यांनी आत्महत्या केल्याने सहकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
स्वप्निलच्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी सर्व काही सुरळीत चालू होतं. सुखी संसार, लहान मुलगा आणि स्थिर नोकरी… पण कालांतराने कौटुंबिक वाद सुरू झाले. सततच्या खटके, घरातील तणाव, तर दुसरीकडे पोलीस दलातील नोकरीचा ताण – या सगळ्यामुळे ते कायमच दबावाखाली राहत. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पत्नीने मुलासह माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्वप्निल पूर्णपणे एकटे पडले होते. घरी आल्यावर भिंती खायलाउठतात, बोलायला कुणी नाही. मित्र किंवा सहकारी यांच्याशी मनमोकळं बोलता येत नाही, अशी खंत त्यांनी सहकाऱ्यांजवळ बोलून दाखवली होती.
या तणावातून बाहेर पडण्यासाठी स्वप्निल पुन्हा संसार टिकवण्याचा प्रयत्न करत होते. पत्नीला मनवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, वाद इतका वाढला होता की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. ११ सप्टेंबरच्या रात्री उशिरा पत्नीशी पुन्हा वाद झाला. मध्यरात्री २ वाजता त्यांनी पत्नीला व्हिडिओ कॉल करून “आता मी जगाचा निरोप घेतो” असं सांगितलं. सुरुवातीला पत्नीला ही केवळ धमकी वाटली, पण चेहऱ्यावरचे भाव पाहून पत्नीला अनर्थ होण्याची शक्यता वाटली. तिने तातडीने शेजाऱ्यांना कॉल करून फ्लॅटमध्ये जाण्याची विनंती केली.
शेजाऱ्यांनी धाव घेतली, पण दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा लागला. शेवटी दरवाजा उघडल्यावर समोर दिसलं ते हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होत, स्वप्निल गळफास लावून मृतावस्थेत आढळले. तातडीने त्यांना खाली उतरवण्यात आलं, पण तोवर सर्व काही संपलं होतं.
पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि मनमिळावू असा होता ते इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असे कोणालाच वाटत नसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कळताच मोठा धक्का बसल्याचे काही सहकारी पोलिसांनी सांगितले. पोलीस खात्यात काम करणारा कर्मचारी व अधिकारी हा अत्यंत जबाबदारीने काम करत असतो मात्र कधीकाळी कामाचा त्रास व तणावामुळे चिडचिड निर्माण होऊन साध्या किरकोळ भांडणातून देखील असे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. त्यामुळे असे प्रकार रोखायचे असल्यास पोलिसांना मेडिटेशनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

