(शिर्डी /अहिल्यानगर)
संभाजीराजे छत्रपती यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी स्वतः अशा भोंदू व्यक्तीचा कडेलोट केला असता,” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिर्डीत साईबाबा समाधी मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात अशा प्रकारच्या कृत्यांना कसे प्रोत्साहन मिळते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संभाजीराजेंनी अशोक खरातवर गंभीर आरोप करत तो पूर्णपणे बोगस असल्याचे म्हटले. “काही पुढाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळेच त्याला अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस झाले,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “त्याला ‘कॅप्टन’ म्हणणे चुकीचे आहे. तो मर्चंट नेव्हीत कर्मचारी होता, कॅप्टन नव्हता,” असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने केवळ अशोक खरातवरच नव्हे, तर त्याला छुप्या पद्धतीने मदत करणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. “महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? अशोक खरातचे व्हिडिओ पाहून मी स्वतःही हादरलो,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
शिवाजी महाराजांवरील वादांवरही प्रतिक्रिया
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांवरून सुरू असलेल्या वादांवर बोलताना संभाजीराजेंनी यामागे “विशिष्ट अजेंडा” राबवला जात असल्याचा आरोप केला. “शिवाजी महाराज हे सर्व धर्मीयांचे आहेत. त्यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य उभारले,” असे त्यांनी नमूद केले. महाराणी ताराबाई यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजेंनी ते अत्यंत बेजबाबदार असल्याचे म्हटले. “संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे रक्षण आणि संवर्धन महाराणी ताराबाईंनी केले. त्यांच्या योगदानाला कमी लेखणे चुकीचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून, अशा भोंदू प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, समाजात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त होत आहे.

