( पुणे )
सायबर फसवणुकीच्या नव्या आणि थरकाप उडवणाऱ्या पद्धतींनी पुन्हा एका नागरिकाला गंडवले आहे. पुण्यात एका कंत्राटदाराने सोशल मीडियावर पाहिलेल्या ‘प्रेग्नंट जॉब’ नावाच्या विचित्र जाहिरातीवर विश्वास ठेवून तब्बल ११ लाख रुपये गमावले आहेत. या जाहिरातीत असा दावा करण्यात आला होता की, “त्या महिलेला गर्भवती करण्याच्या बदल्यात २५ लाख रुपये दिले जातील!”
बाणेर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठेकेदाराला “प्रेग्नंट जॉब” नावाच्या व्हिडीओ जाहिरातीचा मेसेज आला. त्या व्हिडीओमध्ये एक महिला बोलताना दिसत होती, “मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवू शकेल. तो शिक्षित आहे की नाही, कोणत्या जातीचा आहे, गोरा की सावळा याने मला काही फरक पडत नाही.”
ही जाहिरात पाहून ठेकेदाराने त्यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला “प्रेग्नंट जॉब फर्म”चा सहाय्यक प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्याने ‘रजिस्ट्रेशन’ व ‘ओळखपत्र पडताळणी’च्या नावाखाली सुरुवातीला काही पैसे मागितले.
फी, जीएसटी, व्हेरिफिकेशन चार्ज अशा बहाण्यांनी ११ लाख उकळले
ठेकेदाराने त्यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर त्याच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी रक्कम मागितली जाऊ लागली, “रजिस्ट्रेशन फी”, “आयडी व्हेरिफिकेशन”, “जीएसटी”, “मेडिकल क्लिअरन्स”, इत्यादी खर्च येणार असल्याचे सांगितले गेले. अशा प्रकारे सप्टेंबरपासून ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत एकूण ११ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. ठगांनी सतत सबबी देत, धमकावत कधी गोड बोलत पैसे काढले. अखेर ठेकेदाराला शंका आली आणि त्याने त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्याला ब्लॉक केले आणि संपर्क तोडला. तेव्हा फसवणुकीचा हा सारा प्रकार उघड झाला.
देशभर पसरलेला “प्रेग्नंट जॉब” स्कॅम
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह देशभर पसरला आहे. ठग सोशल मीडियावर “प्रेग्नंट जॉब सर्व्हिस”च्या नावाने आकर्षक व्हिडीओ जाहिराती टाकतात, पुरुषांना फसवणुकीच्या आमिषाने सापळ्यात ओढतात आणि नंतर “लीगल प्रोसेस” किंवा “सिक्युरिटी डिपॉझिट”च्या नावाखाली पैसे उकळतात. पोलिसांचा अंदाज आहे की ही फसवणूक एका मोठ्या सायबर नेटवर्कचा भाग आहे, जे सोशल मीडियावरील व्हायरल कंटेंट आणि बनावट ओळखीद्वारे लोकांना फसवत आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, सोशल मीडियावरील अनोळखी आणि संशयास्पद जाहिरातींना प्रतिसाद देऊ नये. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अनैतिक व्यवहारांचे आमिष दाखवणाऱ्या जाहिराती बहुधा सायबर फसवणुकीचा भाग असतात, अशा जाहिरातींपासून दूर राहावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

