(अहिल्यानगर)
राज्यातील शेतकऱ्यांना थेट विक्री आणि निर्यातीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवाराचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. या उपबाजार आवारामुळे शेतकऱ्यांचा माल सहजपणे बाजारपेठेत पोहोचेल, तसेच निर्यात सुविधांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही विक्रीची नवी दारे खुली होतील, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या वेळी त्यांनी दीड कोटी रुपयांचा संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणाही केली.
देश-विदेशात माल निर्यातीची संधी
मंत्री रावल म्हणाले, “महाराष्ट्रात 306 बाजार समित्या आणि 621 उपबाजार आहेत. यामार्फत दरवर्षी 85 हजार कोटी रुपयांचा व्यवहार होतो. फ्रान्समधील सर्वात मोठ्या बाजार समितीसोबत करार करण्यात आला असून, त्यांच्या सहकार्याने महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार आहे. समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जोडणीमुळे महाराष्ट्रातील शेतमाल थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचणार आहे. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल.”
निर्यात सुविधा व प्रशिक्षण
अहिल्यानगर बाजार समितीला आधुनिक निर्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, फळपिकांची निर्यात वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना निर्यातीचे प्रशिक्षण दिले जाईल. राज्यातील भाजीपाला दुबईसह परदेशी बाजारपेठेत पोहोचविण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
ई-नाम व बळकटीकरण योजना
शेतकऱ्यांना जागतिक बाजारभावाची त्वरित माहिती मिळावी म्हणून ई-नाम व्यवस्थेद्वारे राज्यातील 133 बाजार समित्या जोडण्यात आल्या आहेत. तसेच 2,500 कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती बळकटीकरण योजनेतून समित्यांना निधी उपलब्ध होईल. बापगाव येथे 122 एकरांवर उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक निर्यात केंद्राचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
बाजार समित्यांनी बदल स्वीकारले पाहिजेत – विखे पाटील
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे बाजार समित्या सक्षम होत आहेत. डिजिटल मार्केटिंगसारखे बदल स्वीकारल्यास शेतमालाला उत्तम भाव मिळू शकेल. देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर केंद्रीत आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
सुजय विखेंचे संकेत
आभारप्रदर्शनात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “भूमिपूजनाला माजी म्हणून आलो असलो तरी उद्घाटनाला आजी म्हणूनच येणार.” या वक्तव्यातून त्यांनी पुन्हा खासदारकीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत दिले.

