(राजापूर)
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील त्या थकित कर्जदारांविरोधात कर्ज वसुली प्रकरणी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये रत्नागिरी सहाय्यक निबंधक कार्यालामार्फत सुरू केलेली कारवाई नियमाप्रमाणे व योग्यच असल्याचे बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.
राजापूर अर्बन बँकेच्या एकूण १३ शाखा असून अन्य कोणत्याही शाखेत कर्ज वा अन्य कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार वा व्यवहार झालेला नाही, मात्र ज्या रत्नागिरी शाखेत अशा प्रकारे काही कर्जांचे शाखाधिकाऱ्याने नियमबाहय वितरण केले असल्याचे आढळून आले असून त्या शाखाधिकाऱ्याचे निलंबन करून त्याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी अन्य दोषी अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी सुरू असून तशा नोटीस त्यांना बजावण्यात आल्याची माहितीही ओगल व अहिरे यांनी पत्रकारांना दिली.
बँकेबाबत काही मंडळी गैरसमज पसरवत आहेत, तर सोशल मिडियावरही नाहक बँकेची बदनामी करत आहेत. बँकेची स्थिती एकदम उत्तम असून सर्व सभासदांचा बँकेवरचा विश्वास आजही कायम आहे. सन २०२४-२५ च्या लेखा परिक्षणांती संजय मालपाणी एन्ड असोसिएटस (सनदी लेखापाल) यांनी कॅमल रेटींग अंतर्गत दिलेला ड वर्ग अयोग्य ठरवत सहकार आयुक्त व सहकार निबंधक सहकारी संस्था पुणेचे दिपक तावरे यांनी बँकेला ब वर्ग दिला आहे. यावरून बँकेची स्थिती योग्य असल्याचेच पुढे आले आहे. मात्र अशा प्रकारे बँकेची नाहक बदनामी करणाऱ्या विरोधात बँकेकडून कठोर कायदेशीर कारवाईचा अवलंब केला जाणार असल्याचेही ओगले व अहिरे यांनी सांगितले.
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेत कर्ज वितरणात अनियमितता आढळुन आली आहे. सुमारे दोन कोटी सात लाखाच्या कर्ज प्रकरणांत अशा प्रकारे अनियमितता व गैरप्रकार आढळुन आलेला आहे. याबाबत यापुर्वीच बँकेने स्तताहून खुलासा दिलेला आहे. या प्रकरणी बँकेकडून तात्काळ दखल घेत प्रारंभी अंतर्गत चौकशी समिती व त्यांनतर तज्ञांची चौकशी समित गठीत करून चौकशी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शाखाधिकारी यांनी नियमबाहय काम केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला असून तात्काळ याची दखल घेत त्या शाखाधिकाऱ्याचे निलंबन करून त्याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आलेली असून पोलीसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलेला आहे. तर यात दोषी असणाऱ्या अन्य अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी सुरू असून तशा नोटीसही बजावण्यात आल्याचे ओगले व अहिरे यांनी सांगितले. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे त्यांनी नमुद केले. सभासदांचा विश्वास हीच बँकेची संपत्ती असून कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी नमुद केले.
आत्तापर्यंत अशा प्रकारे थकित असलेल्या ३१ कर्जरांविरोधात बँकेने कर्ज वसुली प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये रत्नागिरी सहाय्यक निबंधक कार्यालामार्फत कारवाई सुरू केलेली आहे. तर आणखी १८ कर्जदारांविरोधात ती प्रस्तावित असून तीही केली जाणार आहे. बँकेने केलेली ही कारवाई योग्यच असल्याचे नमुद करताना या कर्जदार सभासदांना याबाबत काहीच माहित नाही हे त्यांचे म्हणने चुकीचे असल्याचे त्यांनी नमुद केले. राजापूर अर्बन बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. त्यामुळे सेव्हींग वा कर्ज खात्यात पैसे जमा होणे, वजा होणे याचा मेसेच त्यांच्या मोबाईलवर येतो, तर गृह कर्ज घेणाऱ्यांनी थेट बिल्डरच्या खाती पैसे वर्ग करण्याच्या सुचना दिलेल्या असतात व त्यांच्याच सुचनेने ते पैसे वर्ग होतात व याबाबतही मेसेज येतात. त्यामुळे अशा प्रकारे आता आंम्ही कर्ज घेतलेले नाही, आंम्हाला माहित नाही अशी बोंब करून नाहक बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असल्याचेही त्यांनी नमुद केले. मात्र बँकेकडून या कर्ज वसुली प्रकरणी कडक व धडक कारवाई होणारच असेही त्यांनी सांगितले.

