(राजापूर / प्रतिनिधी)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रत्नागिरी आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विभाग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यातील मोरोशी गावात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिराच्या आदल्या रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोरोशी गावात मोठे नुकसान झाले होते. वीजपुरवठा खंडित झाला, विजेचे खांब कोसळले, पाणीपुरवठा विस्कळीत झाला तसेच गावातील संपर्क यंत्रणाही ठप्प झाली होती. अशा कठीण परिस्थितीतही ग्रामस्थांनी मोठ्या सहकार्याची भूमिका घेत शिबिर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
श्री गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्ट, मोरोशी गावकरवाडी, तालुका राजापूर यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात श्री स्वामी समर्थ रुग्णालय, लांजा येथील डॉ. सुहास खानविलकर व त्यांची डॉक्टरांची टीम तसेच श्री स्वामी समर्थ नेत्र रुग्णालयाचे डॉ. सुहास देसाई व त्यांची टीम यांनी मोलाचे योगदान दिले. ग्रामस्थांनी त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या शिबिरामध्ये एकूण १२३ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काही रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवडही करण्यात आली. तसेच आयोजित योगा शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
शिबिराचे नियोजन श्री. शशिकांत चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य तपासणी प्रक्रियेची माहिती देताना “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” असल्याचे सांगितले. तसेच दरवर्षी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचा मानसही व्यक्त केला. गावातील ग्रामस्थांनी श्री गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत मोरोशी यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आरोग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त करत आरोग्य यंत्रणेचे आभार मानले.
यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री. प्रकाश सुमती मोतीराम कानडे, विश्वस्त श्री. दिलीप कानडे, श्री. काशिनाथ केसरकर, श्री. रविंद्र कानडे, श्री. नामदेव कानडे, माजी सरपंच श्री. राजेश कानडे, अॅड. श्रीरंग कानडे, श्री. आत्माराम नारकर, श्री. पुंडलिक कानडे, श्री. गुणाजी कानडे, श्री. रमेश कानडे तसेच श्री देवी गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, सभासद आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

