(जैतापूर / वार्ताहर)
२५ मे रोजी वादळी पावसाच्या पार्श्वभूमीतही श्री नवलादेवी प्रासादिक भजन मंडळ, नाटे यांच्या वतीने एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याची दैनंदिन रक्ताची गरज लक्षात घेता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट यांच्यातर्फे रुग्ण साहित्य सेवा केंद्र, नाटे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जायंट्स क्लब रत्नागिरी यांच्या सहकार्याने रुग्णांसाठी आवश्यक असलेले बेड, व्हीलचेअर, वॉकर, कमोड चेअर, स्ट्रेचर यांसारख्या विविध साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सेवा भारती व जायंट्स क्लब रत्नागिरी यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. जायंट्स क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था असून विविध सामाजिक संस्थांना सेवा भावी साहित्य पुरवते. सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट ही धर्मादाय संस्था शिक्षण, स्वावलंबन, सेवा, आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
श्री नवलादेवी प्रासादिक भजन मंडळाने जवळपास वर्षभरापूर्वी रुग्ण सेवा केंद्र सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सेवा भारती ट्रस्टने आवश्यक परवानग्या घेत तातडीने साहित्य उपलब्ध करून दिले. या केंद्रामुळे स्थानिक रुग्णांना अत्यंत अल्प दरात आवश्यक साहित्य उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ओम साई समर्थ मित्रमंडळ, व्यापारी संघटना नाटे, नम्रता बाणे वाडी, भद्रकाली प्रासादिक भजन मंडळ, रिक्षा संघटना नाटे तसेच इतर अनेक मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले. एकूण ५२ जणांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी ४० जणांनी यशस्वीपणे रक्तदान केले.
या उपक्रमासाठी श्री नवलादेवी देवस्थान ट्रस्ट यांनी मंदिराचा रंगमंच व परिसर उपलब्ध करून दिला. मंदिराचे अध्यक्ष, ट्रस्टी, खोत व गावकार दिवसभर शिबिरस्थळी उपस्थित राहून सहकार्य करत होते. भजन मंडळातर्फे सकाळच्या सत्रात चहा, बिस्कीट, केळी, तर दुपारी चविष्ट अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तबद्ध आणि उत्तम नियोजनामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमस्थळी अनेक स्थानिक डॉक्टर उपस्थित होते. त्यांनीही उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले. शिबिराच्या शेवटी श्री नवलादेवी प्रासादिक भजन मंडळाने सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, सहाय्यक ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट, तसेच खोत व गावकार यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. रक्तसंकलनाचे कार्य ‘धन्वंतरी धर्मादाय संस्था’ यांनी पार पाडले.