( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील वाटद-खंडाळा परिसरात झालेल्या सीताराम वीर खून प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे लागले आहेत. मारहाणीनंतरचे वीर यांचे फोटो पोलिसांना प्राप्त झाले असून त्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर व पायावर गंभीर मारहाणीचे स्पष्ट निशाण दिसत आहेत. या फोटोंमुळे तपासाला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.
गुन्ह्यातील संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांनी सीताराम वीर यांचा खून केल्याची कबुली याआधीच दिली होती. मात्र, नातेवाईकांनी मृतदेहावर थेट अंत्यसंस्कार केल्याने पोलिसांना शवविच्छेदन करता आले नव्हते. त्यामुळे खटल्यात पुरावे सादर करण्याचे आव्हान उभे राहिले होते. परंतु आता मिळालेल्या छायाचित्रांमुळे सीताराम यांना मारहाण करून ठार मारल्याचे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा धागा हाती लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम वीर यांचा खून झाला होता. भक्ती मयेकर खून प्रकरणाचा तपास करताना दुर्वास पाटील याने सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खुनाची कबुली पोलिसांना दिली होती. यामुळे तिहेरी हत्याकांडाची उकल झाली होती. दुर्वास पाटीलचे भक्ती मयेकर हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सीतारामला कळले होते. त्याने भक्तीचा मोबाईल नंबर मिळवून तिला वारंवार फोन करायला सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या भक्तीने ही गोष्ट प्रियकर दुर्वासला सांगितली. त्यानंतर सीतारामला धडा शिकवायचा ठरवत दुर्वासने विश्वास पवार व राकेश जंगम यांच्या मदतीने खंडाळा येथील सायली बारमध्ये त्याला बेदम मारहाण केली. काठी, लाथाबुक्क्यांच्या प्रहारात सीतारामचा मृत्यू झाला.
यानंतर दुर्वासने मृतदेह रिक्षाने घरी नेला आणि नातेवाईकांना “दारू पिताना अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध झाला” अशी बनावटी कथा सांगितली. नातेवाईकांनी मृतदेहावर तत्काळ अंत्यसंस्कार केल्याने पोलिसांना महत्त्वाचा पुरावा गमवावा लागला होता.मात्र त्यावेळी एका व्यक्तीने त्या वेळी घेतलेले फोटो आता पोलिसांच्या हाती लागल्याने या खुनाच्या तपासात निर्णायक वळण आले असून न्यायालयीन प्रक्रियेसाठी हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

