(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा परिसरात मंगळवारी सकाळी मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघातात महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्रतिक संदीप जोशी (वय २४, रा. आंजणारी, ता. लांजा) आणि त्यांची पत्नी सौ. स्नेहल प्रतिक जोशी अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हातखंबा रस्त्यावर घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक जोशी हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बीएफ ६६१५) वरून पत्नी स्नेहल यांच्यासह आंजणारी येथून रत्नागिरी–कुवारबाव दिशेने येत होते. याच वेळी कळंझोडी येथून रत्नागिरीकडे जाणारी मोटार (क्र. एमएच-०८ एजे २३०६) आणि दुचाकी यांच्यात हातखंबा येथे जोरदार धडक झाली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकीस्वार दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात स्नेहल जोशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटारीच्या चालक बाजूसह दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

