(मुंबई)
राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. सीईटी नोंदणी करताना उमेदवारांसाठी आधार प्रमाणीकरण आणि अपार आयडी (ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री) सक्तीचा करण्यात आल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार असून परीक्षेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. सीईटी सेलमार्फत सुमारे ३५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
सीईटी अर्ज भरताना उमेदवारांकडे आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. आधारकार्डवरील नाव, दहावीच्या प्रमाणपत्रानुसार जन्मतारीख, अद्ययावत छायाचित्र, पत्ता, वडिलांचे नाव आणि आधारशी जोडलेला चालू मोबाइल क्रमांक असणे आवश्यक असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
आधारसोबतच सर्व उमेदवारांना अपार आयडी तयार करणे बंधनकारक आहे. सीईटी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी अपार आयडी आवश्यक राहणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी दिव्यांग आयडी कार्ड अपलोड करणेही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप यूडीआयडी कार्ड नसलेल्या दिव्यांग उमेदवारांनी ते वेळेत मिळवण्याचे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

