(संगमेश्वर)
तालुक्यातील (साखरपा) मेघी बौध्दवाडीतील ऋतुजा शामसुंदर जाधव (वय-१८) ही तरूणी बेपत्ता झाली असल्याची फिर्याद साखरपा पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली आहे.
याबाबत साखरपा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शामसुंदर विश्राम जाधव यांनी आपली मुलगी ऋतुजा जाधव ही मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घरातून निघून गेली असून ती बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे. मंगळवारी ती सायंकाळपर्यंत घरी न आल्याने घरच्या मंडळींनी इतरत्र तिची शोधाशोध केली परंतु ती कोठेच मिळून आली नाही.
शेवटी तिचे वडील शामसुंदर जाधव यांनी आपली मुलगी ऋतुजा ही बेपत्ता असल्याची फिर्याद साखरपा पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. ऋतुजा हीची उंची पाच फुट दोन इंच असून रंग सावळा, चेहरा गोल, घरातून निघतेवेळी जिन्स पँन्ट, अंगात टिशर्ट त्यावर जँकेट असा पेहराव केला आहे. वरील वर्णनाची तरूणी कोठे आढळल्यास साखरपा पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधण्याचे आवाहन साखरपा पोलीसांनी केले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत.

