(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख बागवाडी येथे घरफोडीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून तब्बल ४ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी संबंधित महिलेने देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश पर्शराम यांची पत्नी शनिवारी हळदी–कुंकवाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेली होती, तर प्रकाश पर्शराम हे कामानिमित्त बाहेर होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाट उघडले. त्यानंतर ड्रॉवरमध्ये ठेवलेली लॉकरची चावी मिळवून लॉकरमधील दागिन्यांच्या बॉक्समधून सोन्याचे मंगळसूत्र, एक सोन्याची चेन, एक सर असे एकूण अंदाजे ४ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३३१ (३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवरुख पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.
या घटनेमुळे देवरुख परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

