(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
प्रितेश रवींद्र सपकाळे हा मुलगा संगमेश्वर येथील पैसा हायस्कूल येथे सातवीत शिकत असून संगमेश्वर वसतिगृहातून दिनांक 11/09/ 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्याने पळ काढत धामणी रेल्वे ब्रिज च्या पुढील बाजूला मुंबईच्या दिशेने उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवत होता. त्यावेळी तेथून ओरस ते डोंबिवली मुंबई येथे निघालेल्या आर्टिका चालकाने गाडी थांबवली, त्यावेळी त्या गाडीमध्ये डोंबिवलीतील वंदना अरविंद चव्हाण या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका होत्या, त्यांनी त्या मुलाला प्रवासासाठी मदत व्हावी म्हणून गाडीमध्ये घेतले.
गाडीमध्ये त्यावेळी त्यांची दोन मुले त्यांच्याबरोबर प्रवास करीत होती. यावेळी चर्चा करताना त्या मुलाला त्यांनी त्याचे नाव विचारले, कुठे जातोयस विचारले तेव्हा त्या मुलाने आपले नाव व कुठून आलो हे सांगितले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा मुलगा पळून आलेला आहे. त्यांनी त्वरीत पुढील प्रवासात आपली गाडी सावर्डे येथील सावर्डे पोलीस स्टेशन येथे नेली व तेथील पोलीस चव्हाण यांच्या ताब्यात त्या मुलाला दिले.
पोलिसांनी त्या मुलाबद्दल सर्व माहिती घेतली. चव्हाण यांनी त्वरित संगमेश्वर वसतिगृह मध्ये चौकशी केली असता त्यांना आढळले की, तो मुलगा संगमेश्वर येथील वसतिगृहातून पळून आलेला आहे. त्यांनी तेथील तुषार मोहिते यांना त्वरित बोलावून त्यांच्या ताब्यात त्या मुलाला दिले व योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

