(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिर परिसरात असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकान गाळ्यांचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथील मंदिर परिसरातील स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी ना. उदय सामंत यांचे जाहीर आभार मानले आहेत.
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी 8 सप्टेंबर रोजी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली एक विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत गणपतीपुळे मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकान गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावणेबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वीच्या पर्यटन विकास आराखड्यातील गणपतीपुळे देवस्थान आवरातील व्यापारी दुकान गाळ्यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिला होता. हा प्रश्न राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी अतिशय योग्य प्रकारे हाताळून येथील व्यापारी दुकान गाळ्यांचे नव्याने काम सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरच योग्य ती कार्यवाही हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गणपतीपुळे देवस्थान समितीच्या पंच कमिटीनेही याबाबत आपला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळे गणपतीपुळे मंदिर परिसरातील व्यापारी वर्गाकडून ना. उदय सामंत आणि गणपतीपुळे देवस्थान कमिटीने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येऊन आभार व्यक्त केले आहेत.
येथील मंदिर परिसरात एकूण 19 व्यापारी दुकान गाळे गेल्या 50 ते 60 वर्षांपासून अस्तित्वात आहेत. यामध्ये स्थानिक दुकानदार गेल्या अनेक वर्षांपासून आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत आहेत. मात्र एकाच ठिकाणी सुमारे 50 ते 60 वर्षांपासून व्यवसाय करीत असताना या स्थानिक व्यापाऱ्यांना आता आपल्या हक्काचे दुकान गाळे नव्या स्वरूपात मिळणार आहेत. यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेऊन व्यापारी गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावल्याने संपूर्ण गणपतीपुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

