(रत्नागिरी /प्रतिनिधी)
अनेक महिन्यांपासून दररोज १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या साखरतर ग्रामस्थांच्या संयमाचा अखेर बांध फुटला. वारंवार तक्रारी, पाठपुरावा आणि निवेदने देऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांनी खरवटे येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळ सुरू असलेल्या वीजखंडितीमुळे घरगुती कामांसह शेती, लघुउद्योग, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. समस्या कायम असतानाही तिच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मोर्चादरम्यान संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत, “आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्षात अंधार” अशी भावना व्यक्त केली. ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
मोर्चानंतर खरवटे विभागाचे विभागीय अधिकारी श्री. पवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. नुकताच विभागाचा कार्यभार स्वीकारल्याचे सांगत त्यांनी साखरतर येथील वीज समस्येची गांभीर्याने दखल घेतली. एका आठवड्याच्या आत आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. याचवेळी श्री. पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांसह साखरतर गावात प्रत्यक्ष पाहणी करत वीजपुरवठा विस्कळीत होण्याची कारणे तपासली. समस्या निर्माण होणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महावितरणच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले असले, तरी दिलेल्या मुदतीत वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन उभारण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. आता महावितरणचे आश्वासन प्रत्यक्षात उतरणार, की साखरतरकरांच्या वाट्याला पुन्हा एकदा अंधार आणि आश्वासनांचाच खेळ येणार? या प्रश्नाकडे लक्ष लागले आहे

