(रत्नागिरी)
बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. जन्मजात श्रवणदोष टाळण्यासाठी मूकबधिर दाम्पत्यांनी मूल जन्माला घालण्यापूर्वी जेनेटिक कौन्सिलिंग करणे गरजेचे आहे. तसेच जन्मानंतर बालकांमध्ये श्रवणदोषाचे वेळीच निदान होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नवजात बालकांच्या श्रवण तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बालकाची ही तपासणी होणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद येथे जागतिक श्रवण दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रानडे यांनी संदेशाद्वारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयातील कान-घसा तज्ज्ञ डॉ. वैभवी व्यास, वाचा उपचार तज्ज्ञ अभिषेक गांधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे, विशेष शिक्षिका मयेकर, मुख्याध्यापक गजानन राजपूत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या व्यवस्थापक आरती कदम उपस्थित होत्या.
जागतिक श्रवण दिनाची ‘समाजातून शाळेकडे प्रत्येक मुलासाठी श्रवण आरोग्य’ ही थीम लक्षात घेऊन प्रस्तावनेत सुनीता शिरभाते यांनी माहिती दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत श्रवणदोष असलेल्या बालकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संदर्भ सेवा योजनांविषयी आरती कदम यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये नवजात बालकांच्या श्रवण तपासणीची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. श्रवणदोष प्रतिबंधाबाबत डॉ. कश्मीरा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, तर लवकर निदान आणि वेळेवर उपचाराचे महत्त्व वाचा उपचार तज्ज्ञ प्राजक्ता भोगटे-सातवसे यांनी स्पष्ट केले.
यावेळी दिव्यांग सक्षमीकरण मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्रवणबाधित दिव्यांगांच्या समस्या, शासकीय योजना व पुनर्वसन याबाबत प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
कार्यक्रमात कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर मुख्य प्रवाहात आलेल्या आर्या सुशांत रेवाळे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रभावी भाषण केले. तसेच कै. के. पी. अभ्यंकर मूकबधिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी फिरत्या श्रवणदोष चाचणी केंद्रामार्फत श्रवणदोष असलेल्या बालकांसह प्रौढांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात साईन लँग्वेज इंटरप्रिटर म्हणून सीमा मुळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजेश गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता संजय बलाढ्ये यांनी केले. कार्यक्रमास दिव्यांग व्यक्ती, पालक व विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

